मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
नागपूर
मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत. राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात, तर काही गोष्टी न सांगता करतात. फडणवीस मित्रत्व जपणार माणूस आहे. मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे. असे असले तरी मित्र म्हणून त्यांच्या नवीन इनिंगला माझ्या शुभेच्छा आहेत. असे म्हणत मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. सोबतच काही अपेक्षा देखील त्यांनी बोलतांना व्यक्त केल्या आहेत. ते नागपूर येथे बोलत होते.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. त्यांनी बॅकलॉक भरून काढावा, त्यांना कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवु शकत नाही. विदर्भाच लेकरू म्हणून विविध क्षेत्रात विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवूया. मध्यंतरी त्यांचे नाव ते बदला घेण्याचं राजकारण करतात असा ठपका होता, तो आता पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, मात्र वैयक्तिक वैरी नसावं, जो समज झाला होता तो समज ही पुसून निघेल, असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.
https://epaper.vidarbhaprajasattak.com