राजकीय स्थितीत त्यागाची भावना ठेवून जनसेवेची लढाई लढणार-बच्चू कडू
प्रहारची मुंबईत समीक्षा बैठक
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२९ मुंबई
येणारा काळ हा संघर्षाचा असून जातीधर्माच्या राजकारणात आपल्याला सेवा व मुद्द्याचे राजकारण समोर आणायचे आहे. धर्म, जात, सत्ता, पैसा या राजकीय स्थितीमध्ये संघर्ष, सेवा, नियोजन व त्यागाची भावना ठेवून जनसेवेचा लढाई लढणार असे प्रतिपादन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले.राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाची महत्वपूर्ण चिंतन बैठक प्रहारपक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान याठिकाणी पार पडली.या बैठकीला संबोधित करत असतांना ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेला अनपेक्षित निकाल, प्रहारची भविष्यातील दिशा, इत्यादि विषयांवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी आ. राजकुमार पटेल, माजी आ.सबाणे, माजी आ. चंद्रिकापुरे, अनिल चौधरी, बल्लू जवंजाळ,गणेश निंबाळकर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार, विविध जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्ष आणि बच्चू कडू यांची ओळख ही त्यांच्या जनसेवेच्या कामामुळे आहे. त्या कामातूनच आपल्याला प्रतिष्ठा आणि राजकीय संधी मिळाली आहे. यंदाच्या निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला नाही म्हणून आपण खचून जाणार नाही. उलट आपण जनतेतच राहून यापुढेही जनसेवेचे काम अधिक जोमाने करत राहणार आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी संपर्क केलं तरी आपण कुठलेही पद घेणार नाही, कारण अशा परिस्थितीत पद घेतले तर त्याला प्रतिष्ठा राहणार नाही. प्रहार आणि बच्चू कडू यांनी जी प्रतिष्ठा कमावली, ती जनतेच्या विश्वासातून मिळवली असून त्याला तडा जाईल असे आपण वागणार नाही. अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
यापुढेही जनतेच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करत राहणार आहे. कारण संघर्ष हीच खरी प्रहारची ताकत आहे. जनतेचे विविध प्रश्न अद्याप सुटले नाहीत, त्यावर काम करण्यासाठी आपण लवकरच दिशा निश्चित करून पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. सेवेचं राजकारण आणि समाजकारण आपण पुढेही चालू ठेवणार आहोत. अशा प्रकारचा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी विविध जिल्ह्यातून आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी आपापले मत व्यक्त केले.
पदाधिकाऱ्यांना भावना झाल्या अनावर
प्रहारच्या चिंतन बैठकीमध्ये आपले मत व्यक्त करतांना काही पदाधिकाऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. निवडणूकीचा पेपर खूप कठिण गेला कारण अभ्यास जनतेच्या सेवेचा व विकासाचा केला परंतु पेपर मात्र जातीधर्माचा निघाला. अश्या संवेदना यावेळी व्यक्त केल्या. येणारा काळ हा संघर्षाचा असून प्रहरचे अध्यक्ष बच्चू कडू हे ज्या प्रमाणे दिशा व निर्देश देतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांची सामाजिक व राजकीय वाटचाल असेल असे देखील पदाधिकारी म्हणाले.बच्चू कडू हे संघर्षातून घडलेले नेतृत्व असून कुणापुढे न झुकता संघर्ष करावा आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास देखील पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !