
अमरावतीत अवैध बांगलादेशी घुसखोरांवरून खासदार अनिल बोंडे आक्रमक
अमरावती :
अमरावती शहरात अवैध बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. रविवारी त्यांनी रहाटगावजवळ थेट रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करत संशयितांना गाठले. यावेळी नागपूर महामार्गावरून ऑटो रिक्षाने सिटीलँड व बिजीलँड व्यापारी संकुलात कामाला जाणाऱ्या काही संशयास्पद व्यक्तींना त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
खासदार बोंडे यांनी व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या संख्येने अवैध बांगलादेशी घुसखोर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. या घुसखोरांमुळे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचाही त्यांनी इशारा दिला. अवैध घुसखोरीवर अंकुश न लावल्यास अमरावतीसाठी मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

या संदर्भात पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार बोंडे यांनी केली. अवैध घुसखोरांचा मुद्दा केवळ कायदा सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
