मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस…. शपथ घेतो की
महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात
विदर्भ प्रजासत्ताक
दि.५ मुंबई
भाजप हा एकमेव पक्ष आहे, जिथं पक्षाचा कार्यकर्ता देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहचू शकतो, असं भाजप नेते ठामपणे सांगतात. राष्ट्र प्रथम, पुन्हा पक्ष आणि शेवटी मी या धारणेनं चालणाऱ्या भाजपच्या बूथ कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असा काटेरी राजकीय वाट तुडवत तुडवत प्रवास करणारे भाजप नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आज महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी देखील शपथ घेतली.
मुंबई येथील आझाद मैदानावर हा ग्रँड सोहळा पार पडला.या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मंत्री, २२ राज्यातील मुख्यमंत्री इतर मंत्री उपस्थित होती. या सोबतच अनेक दिग्गज मंडळी, संत-महंत, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूरमधील एका वार्डात नगरसेवक आणि बूथ कार्यकर्ता म्हणून कधीकाळी मर्यादीत राजकारण केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अमर्याद झेप घेऊन हे यशाचं शिखर गाठलं. कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी असतानाही राजकीय स्पर्धेत स्वतःचं वेगळेपण आणि चातुर्य दाखवत ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. वयाच्या 54 व्या वर्षी ते आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.
नागपूरमधील गंगाधर आणि सरिता फडणवीस यांच्या कुटुंबात 22 जुलै 1970 रोजी देवेंद्र यांचा जन्म झाला. 5 वेळा आमदार राहिलेल्या काकू शोभाताई फडणवीस आणि आमदारकी भूषवलेल्या वडिलांकडून घरातूनच राजकारणाचे धडे गिरवत ते समाजकारणात पुढे आले, सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवणही कुटुंबातून व नागपूरच्या शाखेतून, संघाच्या मुख्यालयातून मिळालेली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणाचा पाया येथूनच भक्कमपणे रचला गेला. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी आपल्यातील नेतृत्वगुणाला चालना दिली. अभाविपचे कार्यकर्ता बनून त्यांनी राजकीय कामाला सुरुवात केली, तर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असताना महाविद्यालयीन निवडणुकांमध्येही सक्रीय सहभाग घेतला. सन 1992 साली त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले, याच काळात त्यांना नगरसेवकपदी संधी मिळाली. 1992 ते 97 आणि 1997 ते 2001 या काळात ते नगरसेवक राहिले. याच काळात नागपूरच्या महापौरपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वार्डातील बूथवरील कार्यकर्ता ही भूमिका देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूषवली. त्यामुळेच, बूथ कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
नागपूर महापालिकेचं महापौर पद भूषवल्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. सन 1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमधून ते पहिल्यांदा राज्याच्या विधानसभेत पोहोचले. 1999 ते 2024 या सलग 25 वर्षे आमदार बनून ते विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत मुंबई गाठली, तर त्यांच्याच नेतृत्वात भाजपने 132 जागांचा विक्रमी आकडाही गाठल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. तर, शरद पवारानंतर सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे दुसरे आमदार आहेत. सन 2014 मध्ये भाजप -शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर ते महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर, 2019 मध्येही त्यांनी दीड दिवसांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राने पाहिली आहे. मात्र, 2019 ते 2024 या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नागमोडी वळणं आली, राजकीय स्थित्यंतरे बदलली आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी तिहेरी भूमिका एकाच टर्ममध्ये बजावणारे नेते म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांनी वेगळाच रेकॉर्ड बनवला आहे. राष्ट्र गीताने या शपथविधी सोहळ्याचा समारोप झाला.