“…म्हणून ते पुन्हा येईन, असे म्हणाले होते”, अमृता फडणवीसांनी सांगितला ‘त्या’ घोषणेचा अर्थ
विदर्भ प्रजासत्ताक
दि.५मुंबई
महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही घटना त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे, याबद्दल माहिती दिली. तसेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेणार? याबद्दल प्रश्न विचारला असता त्याचेही त्यांनी समर्पक उत्तर दिले.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा आमदार झाले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत, याबद्दल खूप आनंद वाटतो. पण आनंदापेक्षा एका जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. महायुती आता एकत्र आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कायम एकत्र राहिल. त्यांचे जीवन संघर्षपूर्ण राहिलेले आहे. मी हे जवळून पाहिले आहे. जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणांमुळेच ते आज इथवर पोहोचले आहेत. संयम हा त्यांचा सर्वोच्च असा गुण आहे.”
म्हणून ते पुन्हा येईन म्हणाले होते
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले होते. यावरून फडणवीस यांना बरेच ट्रोल करण्यात आले. आता ते खरोखर पुन्हा आले आहेत, यावर बोलताना त्या म्हणाल्या, “जेव्हा आपल्याला काही साध्य करायचे असते. तेव्हा
अर्जुनासारखे केवळ लक्ष्य असले पाहीजे. त्यांना पुन्हा खुर्चीसाठी यायचे नव्हते. त्यांना पुन्हा यासाठी यायचे होते कारण त्यांना विश्वास होता की, ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतात, ते इतर कुणी करू शकत नाही. या विश्वासासाठी ते पुन्हा आलेले आहेत, याचा मला आनंद वाटतो.”