निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
नागपूर :
वस्तीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला जाळ्यात ओढून नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना अनेक चित्रफिती तयार केल्या. आता त्या मुलीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे मुलीच्या अश्लील चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित केल्या. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. कवडू धुर्वे रा. सुरेन्द्रगढ असे आरोपी पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित १४ वर्षीय मुलगी आईवडिलांसह राहते. ती आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिच्याच वस्तीत आरोपी कवडू हा पीएसआय राहतो. तो शहर पोलीस दलातील मोटर परिवहन विभागातून सेवानिवृत्त झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांशी त्याची मैत्री होती. त्यामुळे तो नेहमी घरी येत होती. त्याची नजर मुलीवर पडली. घरी कुणी नसताना त्याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मुलीशी अश्लील चाळे केले. आईवडिलांना न सांगण्याची धमकी मुलीला दिली होती. मुलीने कुटुंबियांकडे तक्रार न केल्यामुळे पीएसआयची हिम्मत वाढली. त्याने पुन्हा त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे भ्रमणध्वनीने चित्रिकरण केले. तेव्हापासून तो नेहमी तिला अश्लीच चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन गेल्या अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करीत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती मुलगी त्याच्यापासून दुरावा ठेवत होती. त्याने तिला अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी दिली. तरीही त्या मुलीने हिम्मत एकवटून त्याला विरोध केला. त्यामुळे त्याने वस्तीतील एका व्हॉट्सअप ग्रूपमध्ये तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती पोस्ट केल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी या प्रकाराची मुलीच्या वडिलांना माहिती दिली. मुलीचे कुटुंबिय थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन पोलीस उपनिरीक्षक कवडू धुर्वे याच्यावर बलात्कारासह आयटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले.
पोलीस ठाण्यात तणाव
वस्तीतील अनेक लोकांनी त्या मुलीच्या अश्लील चित्रफिती बघितल्या. त्यामुळे त्या पीएसआयविरुद्ध रोष निर्माण झाला. अनेकांनी पीएसआयला जाब विचारला. मात्र, नागरिकांना दमदाटी करीत होता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांसह वस्तीतील जवळपास शंभरावर नागरिक गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गोळा झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशिर लावल्यामुळे नागरिकांमध्ये रोष होता. मात्र, रात्री उशिरा त्या पीएसआयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
https://epaper.vidarbhaprajasattak.com