जुन्या वैमनस्यातून दोन गटात सशस्त्र हल्ला, ४ जण गंभीर
नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत मधील घटना
दंगा नियंत्रण पथक व पोलीस ताफा तैनात
नांदगाव पेठ
जुन्या वैमनस्यातून येथील एका समाजातील तांबे व शिंदे या दोन कुटुंबात रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान सशस्त्र हल्ला झाला. शाब्दिक वादानंतर एकमेकांवर दगडफेक करून नंतर सशस्त्र हल्ला चढविल्याने घटनेत चार जण गंभीर जखमी झालेत. या घटनेने शासकीय वसाहत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तसेच पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की,दादाराव सुभाष शिंदे व मंगेश धर्मा तांबे या दोघांमध्ये जुन्या कारणावरून रविवारी सकाळी वाद झाला.वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दादाराव व रघुनाथ शिंदेने मंगेश व ईश्वर शिवराम तांबे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. अशातच मंगेश तांबेवर चाकूचे वार करण्यात आले.ही घटना घडताच पसिरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच नांदगावपेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही जखमी दादाराव सुभाष शिंदे, रघुनाथ शिंदे, मंगेश धर्मा तांबे, ईश्वर शिवराम तांबे यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
परिसरात पुन्हा तनाव निर्माण होऊ नये म्हणून येथे दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. डीसीपी गणेश शिंदे, फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलाश पुंडकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत दादाराव शिंदे व मंगेश तांबे यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहे. वृत्तलिहेस्तोव नांदगावपेठ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोन्ही कुटुंब एकमेकांचे सगेसोयरे
शासकीय वसाहत परिसरात तांबे व शिंदे परिवार अनेक वर्षांपासून राहतात. दोन्ही गट एकमेकांचे सगे-सोयरे असून यांच्यामध्ये जुन्या कारणावरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. नांदगावपेठ पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्यानंतर त्यांच्यावर परस्परविरोधी तक्रारीहुन अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तरी देखील आरोपींमध्ये अधुन-मधुन हिंसा भडकतच असते.अशातच रविवारी पुन्हा या घटनेने डोके वर काढून त्याचे मोठ्या घटनेत रूपांतर झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.