सैफ अलीवर खानवर हल्ला करणारा निघाला बांगलादेशी, तपासातून धक्कादायक माहिती उघड
मुंबई –
बॉलिवूड अभिनेता सैफअली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानात घुसून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर ७२ तासाने आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ठाण्याच्या कासारावडली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे हाती लागले नसून तो बांगलादेशी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद (३०) असे अटक आरोपीचे नाव असून तो पाच ते सहा महिन्यापूर्वी मुंबईत आला होता. मुंबईसह ठाणे, भिवंडी भागात तो नाव बदलून काम करत होता. विजय दास सह विविध नावांचा आधार त्याने घेतला. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी पुन्हा मुंबईत आला. तो हाऊस किपिंग एजेंसी मार्फत काम करत होता. सैफ च्या घरात ही तो पहिल्यांदाच गेल्याचे समोर येत आहे. मात्र त्याने तेच घर का निवडले? याबाबत पोलीस तपास करत आहे.
वांद्रे पश्चिमेकडील ग्रँड रेसिडेन्सी हॉटेलसमोरील सदगुरु शरण इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर अभिनेता सैफ अली खान कुटुंबासोबत राहातो. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शहजाद त्यांच्या घुसला होता. आरोपीने सैफ अली खानवर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला करत सहा वार करुन पळ काढला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या एकूण २० पथकांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
आरोपी पळून जाताना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याआधारे आरोपीचा फोटो मिळवत पोलिसांनी अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांची पडताळणी केली. तसेच, काही संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. पण, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. पोलिसांनी वांद्रे परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सकाळी सातच्या सुमारास आरोपी कैद झाला आहे.
गुन्ह्यावेळी घातलेले कपडे आरोपीने बदलून शर्ट-पॅन्ट असा पोशाख परिधान केला. पण, त्याच्या पाठीवर असलेल्या बॅगवरुन पोलिसांनी त्याला हेरले आहे. आरोपीने साडेसात ते आठच्या दरम्यान वांद्रे स्थानकातून लोकल पकडून दादर रेल्वे स्थानक गाठले. सकाळी नऊच्या सुमारास येथील एका मोबाईल दुकानात तो गेला. येथून त्याने हेडफोन खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अखेर डम डाटाच्या मदतीने त्याच्यापर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले. आरोपी मूळचा राजाबरीया नॉलसिटी, जि झलोकाठी बांग्लादेशचा रहिवासी आहे.त्याचे खर नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर (३०) असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.