समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी
नागपूर :
नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली. भीषण अपघातात कारचे चक्क दोन तुकडेच झाल्याने कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गाच्या सर्कलच्या अलिकडे वेणा नदीजवळ हा अपघात झाला. आशादेवी रमेशचंद्र लाहोटी (६७, रा. वाशिम) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अपघातात त्यांचे दोन मुले, सून व एक नातेवाईक दाम्पत्य जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोटी कुटुंबीय हे नागपूरला लग्नासाठी कारने (एमएच ३७ व्ही ४३३३) आले होते. लग्नसोहळा आनंदात आटोपला. सर्व नातेवाईकांच्या भेटी घेऊन सोमवारी रात्री ११ वाजता लाहोटी कुटुंब मूर्तीजापूरकडे परत निघाले. मुलगा रोहित रामेशचंद्र लाहोटी (३६) हा कार चालवत होता. यावेळी कारमध्ये त्याची आई आशादेवी लाहोटी, पत्नी तिलक लाहोटी (३२), भाऊ रोशन लाहोटी (३५) व मूर्तीजापूर येथे राहणारे नातेवाईक दाम्पत्य दिनेश मोहनलाल मालानी (३८) आणि सुनिता मालानी (३३) हे सर्व जण कारमध्ये बसले होते.
ते जबलपूर मार्गाने अमरावती मार्गावर जात होते. मध्यरात्र झाल्यामुळे कारचालकाला झोप येत होती. हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्ग सर्कलच्याआधी असलेल्या वेणा नदीजवळ कार चालक रोहितला डुलकी लागली अन अनर्थ झाला. डुलकी लागल्यानंतर काही सेकंदातच अचानक जाग आली. त्याने कार रस्त्याच्या दुभाजकाजवळ धडकणार असल्याचे समजताच कार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. यातच कार दुभाजकाला जोरदार धडकली. अपघात एवढा भीषण होता की धडकेत कारचे चक्क दोन तुकडे झाले. यात कारमधील पाचही जण जखमी झाले तर रोहितची आई आशादेवी लाहोटी या गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना मागून येणाऱ्या काही वाहनचालकांनी मदत केली.