स्विमिंग टँकच्या पाण्यात सायकल चालवून केले ध्वजारोहण
११ फूट खोली, १ मिनिट ५१ सेकंद रोखला श्वास, अमरावती येथील पोलिस कर्मचाऱ्याची कमाल
अमरावती :
शहर पोलिस दलाच्या अमरावती जलतरण केंद्रावर आपल्या अचाट प्रयोगांनी नाव कमावलेले पोलिस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी आणखी एक कारनामा केला. ११ फूट खोली आणि २१ मीटर अंतर असलेल्या स्विमिंग टँकमध्ये सायकल चालवित त्यांनी ध्वजारोहण केले. १ मिनिट ५१ सेकंदाच्या या कामगिरीदरम्यान ते एकदाही पाण्याच्या वर आले नाहीत. यादरम्यान उपस्थितांचा श्वास मात्र खाली-वर होत होता. प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या सोहळ्यात त्यांनी अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे देशप्रेमाची अनुभूती अमरावतीकरांना दिली.
प्रवीण दादाराव आखरे (४५) हे २५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. अमरावती जलतरण तलावाची ते धुरा सांभाळतात. यापूर्वीदेखील पाण्यावर तरंगत ५० प्रकारची योगासने करीत इंडिया व आशिया बूक रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले होते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ते ११ फूट खोलीच्या जलतरण तलावात सायकलीसह उतरले. त्या सायकलीवर बसून ते २१ मीटर लांबीच्या जलतरण तलावाच्या मध्यभागी पोहोचले आणि ध्वजारोहण केले. त्यानंतर ते दुसऱ्या टोकावर पोहोचले. या सुमारे दोन मिनिटांच्या कारनाम्यादरम्यान श्वासावर नियंत्रण ठेवून पाण्यात ते स्थिर राहिले. यावेळी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बारवकर, गणेश शिंदे, सागर पाटील, निवृत्त उपायुक्त पी.टी. पाटील यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हेल्मेटचे महत्त्व केले अधोरेखित
प्रवीण आखरे यांनी पाण्यातही सायकलवर स्वार होताना हेल्मेट परिधान करून स्वत:ला अपघातापासून वाचविण्याचे आवाहन केले. पाण्यात त्यांची सायकल एकदाही वेडीवाकडी गेली नाही, हे विशेष.
आपत्तीच्या कार्यातही पुढाकार
प्रवीण आखरे यांनी केवळ जलतरण तलावात पोलिस, युवकांना प्रशिक्षित केले नाही, तर आपत्तीच्या काळातही त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी आतापर्यंत विविध जलाशयातून ७८ मृतदेह बाहेर काढले, तर अडकलेल्या ५५ जणांची सुखरूप सुटका केली.