
कृषि प्रदर्शनीमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
पाच दिवसात कृषिज्ञान, सांस्कृतिक कार्यक्रमांची राहणार रेलचेल
मिर्झा एक्सप्रेस, सुर नवा ध्यास नवा, हास्याचे तिखे बोल आकर्षण
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती
आत्माच्या वतीने पाच दिवसांची कृषि प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. यात कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषि प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि प्रदर्शनीच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत दि. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सायन्सस्कोर मैदानावर कृषि विकास परिषद व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कृषि विषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत धान्य, खाद्य, सेंद्रिय शेतमाल, शासकीय योजनांची माहितीसाठी स्टॉल राहणार आहे. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी कृषिला लागणाऱ्या मशिनरी आणि औजारांचे प्रदर्शन राहणार आहे.

प्रदर्शनी दरम्यान दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिर्झा एक्सप्रेस फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी कार्यक्रम, दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कलर्स मराठी टीव्ही फेम साहिल पांढरे यांचा सुर नवा ध्यास नवा, चला हवा येऊ द्या फेम प्रविण तिखे यांचा हास्याचे तिखे बोल हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रदर्शनीत 200 स्टॉल राहणार आहे. यात 40 शासकीय विभागांचे स्टॉल राहणार आहे. यातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनीच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य पथक तैनात राहणार आहे.

कृषि प्रदर्शनीचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात आले आहे. यासाठी कृषि विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घ्यावी. प्रदर्शनीच्या ठिकाणी सुरक्षा, अग्निशमन, पिण्याच्या पाण्याची सोय, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा देण्यात यावा. विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी याठिकाणी शाळांच्या सहली आयोजित करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.