
विमानांचा उन्हाळी नजराणा; नागपूरहून घ्या कोल्हापूरला झेप, जयपूर, नोएडा अन् इंदूरसाठीही सेवा
नागपूर
नागपूर-विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे. होय, आता येथून थेट कोल्हापूर, जयपूरसह ठिकठिकाणी झेपावता येणार आहे. १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीला दिल्लीत स्लॉट समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला डीजीसीए, एएआय स्लॉट्स, एरोड्रोम ऑपरेटर आणि विविध विमान कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर विमानतळावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्या बैठकीत विमानांच्या उन्हाळी वेळापत्रकाच्या स्लॉटवर चर्चा करण्यात आली आणि अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता नागपूर ते कोल्हापूर, नागपूर ते जयपूर, नोएडा आणि नवीन स्थळांवर थेट विमाने झेपावणार आहेत. इंडिगो आणि स्टार एअर या उपरोक्त स्थानांसाठी खालीलप्रमाणे दररोज उड्डाणे चालविणार आहेत.
अशा राहतील विमानांच्या वेळा
१) ३० मार्च २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत रोज सकाळी ७.२० वाजता इंडिगो फ्लाइट ६४१६ जयपूर येथून रात्री ११;०५ वाजता नागपूर विमानतळावर पोहचेल आणि येथून इंडिगो फ्लाइट ६४११ जयपूरला रवाना होईल.
२) १ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत रोज दुपारी ३.४५ वाजता स्टार एअर फ्लाइट २५० कोल्हापूरहून नागपुरात पोहचेल आणि येथून रोज दुपारी ४;१५ वाजता कोल्हापूरकडे स्टार एअर फ्लाइट २५१ निघेल.
३) ३० एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५पर्यंत नोएडा येथून निघालेले इंडिगो फ्लाइट २५१८ नागपूरला दुपारी ४ वाजता पोहोचेल आणि इंडिगो फ्लाइट २५१९ रोज दुपारी ४;३० वाजता नागपूरहून नोएडासाठी उडेल.
याव्यतिरिक्त खालील अतिरिक्त उड्डाणे रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत ठिकठिकाणी झेपावण्यासाठी सज्ज राहिल.
२६ जुलै ते २५ ऑक्टोबरपर्यंत इंडिगो फ्लाइट ७३३६ इंदूरहून दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल आणि इंडिगो फ्लाइट ७३३७ नागपूरहून दुपारी १२.३५ वाजता इंदूरसाठी रवाना होईल.
३० जुलै ते २२ ऑक्टोबरपर्यंत दर बुधवारी इंडिगो फ्लाइट ६१३९ कोलकाता येथून १२;१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि इंडिगो फ्लाइट २३८० १२;४५ वाजता दिल्लीसाठी रवाना होईल.
१ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत रोज दुपारी १;०५ वाजता स्टार एअर फ्लाइट २४५५ पुण्याहून नागपूरला पोहोचेल आणि स्टार एअर फ्लाइट २४६ किशनगड साठी रवाना होईल.
१ एप्रिल ते २५ ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी २;२० वाजता इंडिगो फ्लाइट ६४५५ बेंगळुरूहून नागपूरात पोहोचेल आणि दुपारी २;५५ वाजता इंडिगो फ्लाइट ६४५६ बेंगळुरूसाठी निघेल.
१ एप्रिल ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शनिवार वगळता रोज दुपारी ३.१० वाजता इंडिगो फ्लाइट २४८१ पुण्याहून नागपूरला पोहोचेल आणि येथून दुपारी ३.४५ वाजता इंडिगो फ्लाइट २०२ पुण्यासाठी प्रस्थान करेल.