
रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त
मुंबई –
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या घटनेतील कुणालाही सोडणार नाही असा संतप्त इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी जळगावातील घटनेवर भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.
तर घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी छेडछाड केली ते टवाळखोर नाहीत तर गुंड आहेत. त्यांच्याविरोधात आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत. या मुली जेव्हा यात्रेत गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत एक पोलीस होता, या पोलिसाने गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गुंडांनी पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ केली. माझ्या घरात हा प्रसंग घडला हे नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडतायेत. महिला तक्रार द्यायला पुढे येत नाहीत त्यामुळे असे प्रकार उघडकीस येत नाहीत. या मतदारसंघात गेल्या ३-४ वर्षात गुंडगिरी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीचं संरक्षण या गुंडांना आहे असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.