
मुंबईत हायअलर्ट! दहशतवादी हल्ला, VVIP व्यक्ती होऊ शकतात लक्ष्य; ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.4 मुंबई
मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतच परिपत्रकच जारी केलं आहे. ही बंदी उद्या ४ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. जी पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राहील.
पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करुन दहशतवादी हल्ला तसंच शहरातील VVIP व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी करू शकतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. शहरातील गर्दीची ठिकाणं देखील लक्ष्य केली जाऊ शकतात. याच अनुषंगाने पोलिसांनी या सर्व प्रकारच्या ड्रोन वापरावर बंदी घातली आहे.
मुंबई पोलिसांचे अधिकार क्षेत्र आणि डीसीपीच्या परवानगीविना ड्रोन, रिमोट कंट्रोल ऑपरेटेड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडर वापरला गेल्यास कडक कारवाई केली जाईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.
———————————————————–