
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१८बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात ‘देव दर्शन’ यात्रेसाठी निघालेल्या एका बसची पार्क केलेल्या ट्रकला धडक झाल्याने 35 भाविक जखमी झाले आहेत. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही बस आंध्र प्रदेशाहून नाशिक आणि शिर्डी या पवित्र स्थळांना जात असताना ही घटना घडली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला, त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी संदीप काळे यांनी सांगितले की, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे नेमके कारण काय? या बाबत तपास सुरू आहे. मात्र, या बाबत प्राथमिक माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पार्क केलेल्या ट्रकमध्ये कोणतेही इशारा देणारे संकेतक नव्हते. ज्यामुळे बस ती ट्रक दिसली नाही आणि चालकाला धडक टाळणे कठीण झाले असावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 रुग्ण दाखल – डॉ. अनंता मगर
या संदर्भात वृत्त संस्थेशी बोलताना बुलढाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. अनंता मगर म्हणाले की, “बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 10 रुग्ण दाखल झाले आहेत. आंध्र प्रदेशातील भाविक देव दर्शनासाठी नाशिक आणि शिर्डी येथे जात असताना, त्यांच्या बसला अपघात झाला यात 35 जण जखमी झाले आहेत. काही रुग्णांवर मलकापूर येथेच प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. तर त्यातील गंभीर जखमी झालेल्या भाविकांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर येथे उपचार सुरु असल्याची माहिती देखील डॉ. मगर यांनी दिली आहे. अशा दहा रुग्णांवर बुलढाणा येथे उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.