अंत्यसंस्कारातही प्रचार! ‘लक्ष असू द्या साहेब…’ म्हणत उमेदवारांची संवेदनशीलतेला तडा
विदर्भ प्रजासत्ताक
महापालिका निवडणुकीस अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील प्रचाराने सर्व सामाजिक, नैतिक आणि भावनिक मर्यादा ओलांडल्याचे चित्र दिसत आहे. प्रचारसभा, रॅली, पदयात्रा यांपुरते मर्यादित न राहता उमेदवारांनी आता थेट मतदारांच्या सुख-दु:खाच्या क्षणांमध्येही प्रचाराची संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रचार अधिकाधिक वैयक्तिक आणि आक्रमक होत चालल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे काही उमेदवारांनी स्मशानभूमीतही प्रचार सुरू केल्याच्या घटना समोर येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईक व नागरिकांना ‘लक्ष असू द्या साहेब…’ असे म्हणत उमेदवार मतांची मागणी करत असल्याचे प्रकार चर्चेचा विषय ठरत आहेत. शोकाकुल वातावरणातही राजकीय गणिते मांडली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “दु:खाच्या क्षणी तरी माणुसकी जपली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांकडून उमटत आहे.
याचबरोबर शहरातील शाळा परिसरही प्रचारापासून सुटलेला नाही. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काही उमेदवार थेट गेटजवळ उभे राहत पालकांशी संवाद साधताना दिसत आहेत. शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा विषयांवर आश्वासनांची सरबत्ती केली जात आहे. मात्र शाळा परिसरात प्रचार करणे कितपत योग्य आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणूक प्रचाराचा व्याप आता सार्वजनिक चौक, मैदानांपुरता मर्यादित न राहता खासगी आणि संवेदनशील ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे. लग्नसोहळे, डोहाळे जेवण, वाढदिवस, गृहप्रवेश यांसारख्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये उमेदवारांची उपस्थिती सामान्य झाली आहे. शुभेच्छांच्या आडून मतांचे गणित मांडले जात असून, कार्यक्रमातील प्रत्येक संधीचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न होत आहे.
आचारसंहिता लागू असतानाही प्रचारासाठी वेळ, जागा आणि संवेदनशीलतेची कोणतीही सीमा उरलेली नसल्याचे सध्याचे चित्र आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी मतदार भेटला की संवाद साधायचा, अशीच रणनीती उमेदवारांनी स्वीकारल्याचे दिसते. यामुळे काही नागरिकांमध्ये चिडचिड तर काहींमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे.
दरम्यान, निवडणूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून आचारसंहितेच्या पालनाबाबत आवाहन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात अशा प्रकारांवर कितपत नियंत्रण राहील, हा प्रश्न कायम आहे. प्रचाराच्या या अतिरेकामुळे मतदारांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे वास्तव असून, राजकारणाने माणुसकीवर मात करू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

