“उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो”, भर सभेत नवनीत राणांचा हल्लाबोल
तुरुंगामध्ये कशी घालवली रात्र? अनुभव सांगताना स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर….
दि.६ वि.प्रजासत्ताक अमरावती
आज हनुमान जयंती आहे. राज्यभरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज ( ६ एप्रिल ) सामूहिक हनुमान चालिसाचे पठण केले. यानंतर बोलताना नवनीत राणांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो’, अशी टीका नवनीत राणांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे आपले घर सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारांवर तुमचे ४० आमदार निवडून आले, ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी जिवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले, ती विचारधारा तुम्ही सांभाळू शकला नाहीत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला, त्याने माझी विचारधारा ‘मातोश्री’त ठेवली नाही,” असे टीकास्त्र नवनीत राणांनी सोडले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला त्याचसोबत जेलमध्ये १४ दिवस ठेवण्यात आले. त्यावेळचा अनुभवही लोकांना सांगितला. लॉकअपमध्ये एका महिलेवर कसे अत्याचार केले? आई, तुला जेलमध्ये का टाकले? असं माझ्या लहान मुलाने विचारले असं सांगत खासदार नवनीत राणा यांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले. भावनिक होत त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला अनुभव शेअर केला.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, लॉकअप काय असते याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. लॉकअपमध्ये रात्री १२ वाजल्यापासून कोर्टात नेण्यापर्यंत मी अशीच उभी होते. मला काहीच सुविधा दिली नाही. बसायला खुर्चीही नव्हती. मला रात्रभर होणाऱ्या वेदना पाहून तिकडचे पोलीसही व्यतित झाले. ही जागा तुमची नाही असं ते म्हणाले. तुम्ही लढून बाहेर पडाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १२ तास जेलमध्ये उभीच होते. हात मागे ठेऊन मी विचार करत होते. मी आयुष्यात कुठली चूक केली त्यामुळे असं सरकार राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
त्याचसोबत कोर्टात गेली तेव्हा आमच्या वकिलांनी कलमे पाहून तुमचा जामीन होईल असं सांगितले. मात्र पोलीस स्टेशनची डायरी पाहिली तेव्हा देशद्रोहाचा खटला दाखल केलाय असं म्हटलं. तेव्हा आम्हाला जेलमध्ये काही दिवस राहावे लागेल. जामीन मिळणार नाही असं वकिलांनी सांगितले. तेव्हा मी मानसिकरित्या खचले होते. रामाच्या नावाने १४ वर्ष रवी राणा आणि मला जेलमध्ये ठेवले असते तरी काय वाटले नसते. परंतु देशद्रोहाखाली जेलमध्ये टाकले ते दु:ख सहन करण्यासारखे नव्हते असं नवनीत राणा म्हणाल्या.
तसेच जेलमध्ये पाणी मागितले तेव्हा सीसीटीव्ही आहे पाणी देऊ शकत नाही असं सांगितले. माझ्यासमोर जेलमध्ये इतर महिला होत्या त्यांना पाणी मिळत होते. राज्य सरकार आमच्यावर डोळे लावून बसलेत त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही असे शब्द पोलिसांचे होते. इतका अत्याचार महिलेवर करण्यात आला. एक महिना जेलमध्ये राहावे असा कट रचण्यात आला. मला जेलमध्ये का टाकले असं मला माझी लहान मुले विचारत होते. मी लढण्यासाठी मुंबईत गेले नव्हते. माझा विश्वास ते तोडू शकले नाही. माझ्यावर अत्याचार करूनही विश्वास तोडू शकले नाहीत असंही नवनीत राणा यांनी सांगितले.
दरम्यान, माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको, यासाठी मी दरदिवशी १०१ वेळा हनुमान चालीसा पठण जेलमध्ये म्हटली. उद्धव ठाकरे तुम्ही सोन्याच्या ताटात मोठ्या घराण्यात जन्म घेतला असला तरी आमची आस्था तुमच्याहून जास्त आहे. लोक तुमच्या नावाने घाबरत असेल. रवी राणा, नवनीत राणा तुम्हाला घाबरत नाहीत. देवाचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. १४ दिवसानंतर जेलमधून मला हॉस्पिटलला आणले. माझ्या नवऱ्याला पाहून मी रडले त्यावरही प्रश्न उपस्थित केला अशा वेदना नवनीत राणांनी बोलून दाखवल्या.
@ विदर्भ प्रजासत्ताक