पोलीस अधिकक्षांच्या बंगल्यावरील पाच पोलीस कर्मचारी का झाले निलंबित
अमरावती
जनतेची सुरक्षा करणारे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्याच बंगल्यातील चंदनाचे झाड चंदन चोरट्यांनी कापून नेल्याने पोलीस अधिक्षक बारगळ यांनी बंगल्यावर तैनात पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
चंदन चोरांनी याआधी न्यायाधीश, जिल्हाधिकारी, वनविभाग कार्यालय येथील चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतू आता चंदन चोरट्यांनी थेट पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बंगल्यातील २० फुटाचे चंदनाचे झाड कापून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बंगल्यावर दिवस रात्र सुरक्षाकर्मचारी तैनात असतात. सुरक्षेचा चोख पहारा असताना देखील चोरट्यांनी १३ एप्रिलला मध्यरात्री बंगल्यातील
झाड कापून नेले. ही बाब सकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांना माहिती व त्यानंतर गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चंदन चोरांचा शोध सुरु केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बंगल्यावरील तैनात कर्मचारी वृषभ सराटे, विनोद वानखडे, अजिंक्य खंगार, महिला पोलीस हवालदार सिमा इंगळे व शिपाई आम्रपाली गणवीर यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.