मोर्शी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत करा !
रुपेश वाळके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी !
अटी निकष बाजूला ठेवून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या :
दि4 वि.प्रजासत्ताक मोर्शी ११
अवकाळी पाऊस, गारपीटमुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व जाचक अटी, निकष बाजूला ठेऊन मदत करण्यासाठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
मोर्शी तालुक्यातील घोडदेव, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, दापोरी, हीवरखेड, उमरखेड, बेलोना, मायवाडी, भाईपुर परिसरात २७ एप्रिल रोजी २ वेळा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत बळिराजाचे सांत्वन करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मोर्शी तालुक्यात संत्रा, मोसंबी, गहू, कांदा, टोमॅटो, मका, आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने नुकसान झाले असून शेतकरी संपूर्ण उद्धवस्त झाला आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाने सर्व निकष, जाचक अटी बाजूला सारून पंचनाम्याची वाट न बघता मदत करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन सचिव यांना पत्र पाठऊन मागणी केली असल्याचे रुपेश वाळके यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण संत्रा शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात हातातोडांशी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. संत्रा पिकांचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. गहू, भाजीपाला आणि संत्रा मोसंबी फळबागानांही मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांपुढे कसे जगावे हा प्रश्न आहे.