निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट
आजपासून पेट्रोल डिझेल दोन रुपयांनी स्वस्त
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली असून, नवीन किमती 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 2 रुपयांनी कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोट्यवधी कुटुंबाचे कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलचे दर 50 ते 72 टक्क्यांनी वाढले होते. आपल्या शेजारील अनेक देशांमध्ये तर पेट्रोल उपलब्ध नव्हते. 1973 नंतर पहिल्यांदाच इंधनाचे सर्वात मोठे संकट असूनही पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशावर त्याचा परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत 4.65 टक्क्यांनी कमी झाले.’
39 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी
पुरी यांनी पुढे लिहिले की, ‘भारतात इंधनाचा पुरवठा स्थिर राहिला, स्वस्त दरात राहिला आणि सरकारची पावलेही हरित ऊर्जेकडे जात राहिली. याचा अर्थ भारताने उर्जेची उपलब्धता, शाश्वतता राखली. भारत हा एकमेव देश होता, जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. पीएम मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 27 देशांकडून कच्चे तेल खरेदी करायचो, परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या देशवासीयांना स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस देण्यासाठी ही व्याप्ती वाढवली आणि आता गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही 39 देशांकडून खरेदी करत आहोत.’
@vidarbha prajasattak