अमरावती मधून बळवंत वानखडे,भंडारा-गोंदिया – नाना पटोले निश्चित सूत्रांची माहिती
कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
@ विदर्भ प्रजासत्ताक
काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू (कोअर) समितीची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील काँग्रेसच्या 50 उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. बैठकीअंती या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आज रात्री काँग्रेस पक्षाकडून या उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. यामध्ये महाराष्ट्रातील 7 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती आहे. हे 7 उमेदवार नेमके कोण, हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, यामध्ये प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर यांची नावे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम न झाल्यामुळे अद्याप काँग्रेस किती जागा लढेल, याबाबत निश्चितता नाही. परंतु, काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रात लोकसभेच्या 18 जागांवर उमेदवार उभे केले जाऊ शकतात. यापैकी 7 जणांची नावे निश्चित झाल्याची माहिती आहे. काँग्रेस कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीला गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानातील नेते उपस्थित होते. सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सर्व नेत्यांनी उमेदवारांबाबत चर्चा केली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काहीसा उशीर झाला. त्यामुळे त्यांना धावत-धावत बैठकीच्या ठिकाणापर्यंत जावे लागले. कोअर कमिटीची आजची बैठक संपली असून आता गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता पुढील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा बैठकीला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी
1. भंडारा-गोंदिया – नाना पटोले
2. चंद्रपूर – विजय वडेट्टीवार
3. अमरावती- बळवंत वानखेडे
4. नागपूर – विकास ठाकरे
5. सोलापूर – प्रणिती शिंदे
6. कोल्हापूर – शाहू महाराज
7. पुणे – रविंद्र धंगेकर
8. भिवंडी- दयानंद चोरगे
9. नंदुरबार – के सी पाडवी
10. गडचिरोली- नामदेव किरसान
11. नांदेड – वसंतराव चव्हाण
12. लातूर – डॉ. कलगे
13. सांगली – विशाल पाटील
महाराष्ट्रमधील दोन महिला नेत्यांना लोकसभेची उमेदवारी
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanokar) यांना उमेदवारी दिली जाईल. या जागेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील इच्छूक होत्या. मात्र, गेल्यावेळी बाळू धानोरकर यांनी मोदी लाटेतही चंद्रपूर मतदारसंघ काँग्रेसला जिंकवून दिला होता. त्यामुळे आता पक्षाने त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच चंद्रपूरमधून उमेदवारी दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर आणि प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीची लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगितले जात आहे.
@ विदर्भ प्रजासत्ताक