
चिखलदरा येथे पर्यटकांच्या वाहनाला अपघात
अमरावती
पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या एका चारचाकी वाहनाला चिखलदरा ते घटांग मार्गावरील शहापूरनजीक शनिवारी रात्री ११ वाजता अपघात झाला. यात असलेले पर्यटक बेधुंद वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मेळघाटातील मार्गावर रिमझिम पाऊस व शुभ्र, दाट धुक्यात रात्रीचे वाहन हळू चालवावे लागते. परंतु, चालकाला अंदाज न आल्याने ते वाहन थेट पुलाखाली गेले.यामुळे त्यातील काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. हे पर्यटक कुठले, याची माहिती पोलिस घेत आहेत. चिखलदरा पोलिसांना यासंदर्भात डायल १०२ वरून नागरिकांनी माहिती दिली. चिखलदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी म्हणून वेगमर्यादा पाळून वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेकदा याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात होतात.