लकी ड्रॉमध्ये १० लाखाचे आमिष
व्यापाऱ्याने गमावले 11.93 लाख
अमरावती
ऑनलाईन ठगबाजांनी नागपुरीगेट भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला लकी ड्रॉमध्ये १० लाख व सोने लागल्याचे आमिष देऊन त्यांची तब्बल ११ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात ठगबाजांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सैय्यद अशफाक अली सैय्यद अली (५२) रा. सुफियाना नगर १, अमरावती असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सै. अशफाक यांच्या मोबाइलवर +९२३३९२४६२९ क्रमांकाच्या मोबाइलवरून कॉल आला. तुमच्या मोबाइल क्रमांकाचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला असून तुम्हाला १० लाख व सोने पाठवायाचे आहे. मी मुंबई ऑफीसमधून बोलतो, असे समोरच्या व्यक्तीने सै. अशफाक त्यांना सांगितले. तसेच रजिस्ट्रेशनव आंततराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य सरकारच्या विविध कराची रक्कम भरावी लागणार असल्याही फोनवरील व्यक्तीने सांगितले. १० लाख रूपये व सोने मिळणार असल्याने सै. अशफाक ऑनलाईन ठगबाजांच्या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी आपला अकाऊंट क्रमांक, आधारकार्ड, पॅनकार्ड क्रमांकासह विविध प्रकारची माहिती ठगबाजासोबत शेअर केली. याचाच फायदा घेऊन ठगबाजांनी सै. अशफाक यांना विविध कारणाने तब्बल ११ लाख ९३ हजार ४०० रूपये भरायला लावले. सै. अशफाक यांनी अधिक पैसे भरण्यास नकार देताच सर्व ऑनलाईन ऑफलाईन झाल्याने फसवणूक झाल्याचे कळताच सै.अशफाक यांनी याबाबत शहर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी अज्ञात ऑनलाईन ठगबाजाविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलिस पुढील तपास करित आहेत.