
आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे अभिनंदन व आभार
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
अमरावती महानगर पालिकेच्या वतीने वर्ष २०२३-२०२४ पासून अंमलात आणलेल्या नवीन मालमत्ता कर आकारणी व वसुलीला शासनाच्या वतीने नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या नगर विकास विभागाने या संदर्भात नुकतेच ५ सप्टेंबर २०२४ रोजी आदेश निर्गमित करून *”श्रीमती सुलभा संजय खोडके मा. विधानससभा सदस्य यांच्या पत्राच्या अनुषंगाने अमरावती महानगर पालिकेद्वारे चालू असलेल्या कराच्या पुनर्मुल्यांकन प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत आहे”* असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांना पत्राद्वारे दिले आहे. शासनाचे आदेश प्राप्त होताच मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी स्थगितीच्या अंमलबजावणीला घेऊन सर्व प्रक्रिया सुरु केली असून नव्या कर आकारणीच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बदल करण्याचे काम मनपाच्या वतीने युद्धपातळीवर करण्यात येत आहे. अमरावती शहरातील मालमत्ताधारकांना करवाढीतून मोठा दिलासा देणाऱ्या शासनाच्या स्थगनादेशाची अंमलबजावणी केल्या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती महानगर पालिकेने वर्ष २०२३-२०२४ मध्ये केलेल्या नवीन कर आकारणीला स्थगिती मिळण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सदर नवीन कर आकारणीची प्रक्रिया ही तांत्रिक दृष्ट्या गुंतागुंतीची असून नियमानुरुप नसल्याने याला स्थगिती मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दोन्ही उपमुख्यंमत्री ना.अजितदादा पवार,नामदार देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली असता यावर शासनाने स्थगितीचे आदेश काढून अमरावती मधील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. या आदेशावर अंमलबजावणी करण्याला घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी कालच दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ रोजी मनपा कर मूल्यांकन अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा देण्याचे धोरण अवलंबिले आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली असून सॉफ्टवेअर मधील तांत्रिक बदल करण्याची गरज असल्याने सदर काम सुद्धा युद्धपातळीवर सुरु आहे.
त्यामुळे मागील वर्षीचा बेस रेट कायम ठेवून जुन्याच पद्धतीने कर आकारणी होणार असून ज्या मालमत्ताधारकांनी यावर्षी ऑगस्ट २०२४ पर्यंत कर भरला, त्यांचे नुकसान होऊ नये म्ह्णून त्यांच्या वाढीव दराचे समायोजन पुढील वर्षात करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वर्ष २०२४ च्या नवीन कर आकारणी व वसुलीला शासनाने स्थगिती दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याने शहरातील जुन्या ९० हजार मालमत्ताधारकांना व सर्वेक्षणात नव्याने आढळून आलेल्या ५५ हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात प्रथम वाचा आमच्या सोबत @विदर्भ प्रजासत्ताक