सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी पर्यंतच्या
नवीन पोलादी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला होणार सुरुवात
अमरावती ११ सप्टेंबर :
अमरावती शहराला वर्ष २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येला मुबलक व नियमित जलपूर्ती करण्याचे व्हिजन बाळगून अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाकडून मंजूर करून आणला आहे. सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याला घेऊन आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांचा शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु असतांना नुकतेच दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ रोजी नगरविकास विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी ८६५.२६ कोटीच्या खर्चाच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शासनाचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
अमरावती शहराला मुबलक व नियमित पाणी पुरवठ्या संदर्भात आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु असून मागील ७ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात बैठक घेतली. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाई पर्यंतची डब्लूटीपी पाईप लाईन जुनी लोखंडी असून शिकस्त झाली आहे. या गुरुत्व वाहिनीचे ३० वर्षाचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने वारंवार गळती लागत आहे. एक गळती दुरुस्त करण्यासाठी चार ते पाच दिवस लागत असल्याने नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत गैरसोय निर्माण होते. म्ह्णून सद्या शहराला एकदिवस आड व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे.अशी बाब बैठकीत प्रकर्षाने समोर आली होती. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाची अमृत- २ ही एक योजना असल्याने ती अमरावती यामध्ये कार्यान्वित करण्याला घेऊन दिनांक २५ एप्रिल २०२२ तसेच दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी मजीप्रा बैठकीत मंथन झाले असता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प अमरावतीत राबविण्यासंदर्भात आमदार महोदयांनी ठोस भूमिका घेऊन तसा प्रस्ताव शासकडे पाठविण्याची सूचना मजीप्रा प्रशासनाला करण्यात आली.
दरम्यान गेल्या मार्च २०२३ च्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करतांना या योजनेला प्रस्ताव कधी मान्य करणार ? असा प्रश्न लावून धरीत शासनाचे लक्ष वेधले होते .यावर मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने सभागृहात निवेदन देतांना मंत्री ना.उदय सामंत यांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समिती पुढे हा प्रस्ताव सादर करून केंद्र शासनाकडे शिफारस करणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. दरम्यान आमदार महोदयांनी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना सुद्धा अवगत केले होते.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी याबाबत राज्य स्तरीय उच्चाधिकारी समितीचे प्रमुख तथा राज्याचे मुख्य सचिव यांना आपल्या दालनात बोलावून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या संदर्भातील कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून केंद्र सरकारकडे शिफारस करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना मुख्य सचिवांना केल्या होत्या.
तदनंतर गेल्या ५ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची बैठक झाली असता अमृत २ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली व एकूण ९८५.४९ कोटींच्या अमृत २ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजने अंतर्गत केंद्र शासन ३२८.४८ कोटी इतका भार उचलेल व उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून खर्च करून हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे. असा निर्णय घेऊन राज्य उच्चाधिकार समितीच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली. दरम्यान १० जानेवारी २०२४ रोजी केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक नगरविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असता सदर प्रकल्पाला तांत्रिक समितीने मान्यता प्रदान केली होती.
तर दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्र पुरस्कृत अमृत-२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना ९८५.४९ कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या शिखर समितीची मान्यता मिळाल्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
अशातच या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याला घेऊन हालचाली सुरु असतांना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी सदरच्या योजनेचा आढावा घेत निविदा मंजूर करून नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे शिफारस केली होती. या शिफारशीच्या अनुषंगाने आता नुकतीच ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रधान सचिव नगर विकास विभाग तथा राज्यस्तरीय तांत्रिक समितीचे अध्यक्ष गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेच्या अमृत -२ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी ८६५.२६ कोटी निविदेस मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच अमृत २ अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत केंद्र शासन ३६.३३ टक्के इतका भार उचलेल व राज्य शासनाकडून ३६.६७ टक्के इतका शासन वाटा देणार असून उर्वरित ३० टक्के इतका भार मजीप्रा उचलणार आहे.तर अमरावती महानगर पालिका कुठलाही भार उचलणार नसल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
अमरावतीला वर्ष २०५५ पर्यंत नियमित व मुबलक पाणी पुरवठा मिळण्याला घेऊन अमृत २ योजनेच्या कामासाठी ८६५.२६ कोटींच्या निविदेस मान्यता मिळाल्याने आता लवकरच सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी पर्यंतच्या मृदू पोलादी जलवाहिनी अंथरणेचा कामाला सुरुवात होणार आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच या सर्व प्रक्रियेत विशेषतः लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा करून अमरावतीकर जनतेच्या पाणी पुरवठ्या संदर्भात अमृत २ योजनेचा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे सुद्धा आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी आभार मानीत अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात प्रथम वाचा आमच्या सोबत @विदर्भ प्रजासत्ताक