मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा; म्हणाले, “दोन दिवसात मी…”
:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्थींसह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांत आपण जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
कथित मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली. दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या, असेही ते म्हणाले.