न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची यंदाही निघणार भव्य मिरवणूक
ढोलताशा पथकांना दिला जाणार पुरस्कार, मिरवणुकीच्या मार्गात अखंड
राहणार रांगोळी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१९अमरावती
दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक २३ सप्टेंबरला निघणार आहे. या मिरवणूक मार्गावर रांगोळी काढली जाणार आहे. विविध ढोल पथकांचा त्यात समावेश राहणार असून त्यांना तीन निकषांवर पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे सर्वेसर्वा दिनेश बूब यांनी बुधवारी (ता. १८) पत्रपरिषदेत दिली.
विदर्भाचा राजाच्या मिरवणुकीत १५ ढोल पथक सहभागी होतील. मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण सिटी न्यूज व युसीएनद्वारे करण्यात येणार आहे. मिरवणुकीत होणारी गर्दी लक्षात घेता, वयोवृद्ध भक्त व गरोदर महिला व बालकांनी मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभागी होण्याऐवजी घरी बसूनच टिव्हीवर मिरवणूक बघावी, मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांनी आपापली आभूषणे व मोबाईल सांभाळावे, असे आवाहन दिनेश बूब यांनी केले.
एचडी आर्ट संस्थेद्वारे मिरवणूक मार्गात अखंड रांगोळी काढण्यात येईल. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्व ढोल ताशे पथकांचे निरीक्षण करण्यात येईल. या निरीक्षणासाठी पाच लोकांची समिती गठित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट वादन, शिस्तबद्धता, सादरीकरण या निकषांवर तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. पुढील वर्षी एका उत्कृष्ट भजनसंध्या कार्यक्रम करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. स्वराज पथक, छत्रपती पथक, रामराज्य पथक, शौर्य रुद्र पथक, – जगदंब पथक, वक्रतुंड पथक, शिवराज्य पथक, वाद्य सम्राट पथक, बाबुळगाव ढोल पथक, धामणगाव ढोल पथक
अमरावती), शिवसाम्राज्य पथक, दैवत पथक वर्धा, हिंद हिंद वीर स्वराज्य पथक परतवाडा, शिवराष्ट्रपथक पांढरकवडा, शिव साम्राज्य पथक नागपूर या पथकांचा मिरवणुकीत समावेश राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्र परिषदेला मंडळाचे अध्यक्ष दिनेश बुब यांच्यासह दैनिक अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, ईगल हॉटेलचे संचालक बिट्टट्टू सलुजा, कार्यकारी अध्यक्ष भैय्यासाहेब पवार, बालाजी मंदिराचे अध्यक्ष महेश साहू, शिवसेनेचे (उबाठा) युवा नेते धीरज श्रीवास, मंडळाचे सचिव विनोद डागा व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.