‘वंचित’ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खा.वानखडेंच्या घरासमोर राडा…
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२० अमरावती :
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपतर्फे ठिकठिकाणी आंदोलन केले जात असताना आता वंचित बहुजन आघाडीने राहुल गांधी यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. बळवंत वानखडे यांच्या समर्थकांनीही प्रत्युत्तर देत घोषणा दिल्या.
मोर्चा घरासमोर पोहचल्यानंतर धैर्यवर्धन पुंडकर यांचे भाषण सुरू झाले, त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळले. पुंडकर यांनी बळवंत वानखडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. प्रत्युत्तरादाखल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आव्हान, प्रतिआव्हान देण्यात आले आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले.