
संतापलेल्या शेतकऱ्याने पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला धो-धो धुतले
शेतीचे नुकसान जास्त झाल्याचे दाखविणासाठी मागितले होते पाच हजार
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२३ मोर्शी [ मंगरूळ ]
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील मंगरूळ गावात शेतीच्या पिकाचे नुकसान जास्त दाखवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी आज चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी मध्ये चांगलीच खळबळ उडाली.
अमरावती जिल्हयात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एक रुपयामध्ये पीकविम्यात सहभाग घेता येत असल्याने विभागातील २८.७२ लाख शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे. त्यातच पावसाची सरासरी १२१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्याप थांबलेली नाही. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिवाय शेतात पाणी साचूनही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विहित मुदतीत म्हणजेच नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत विभागातील ७ लाख ५३ हजार ६१० शेतकऱ्यांनी संबंधित पीकविमा कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केलेले आहेत. कंपनीद्वारा सर्व्हे करण्यात येऊन पीकविम्याचा परतावा देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मात्र जिल्ह्यात काही पीक विमा एजंट हे भोळ्या बाभड्या शेतकऱ्यांकडून पैसे मागतात अशीच एक घटना आज दि.२३रोजी मोर्शी तालुक्यातील मंगरूळ गावात घडली या ठिकाणचे शेतकरी अनिकेत मोहोड यांच्या सात एकर सोयाबीनचे नुकसान जास्त दाखवण्यासाठी विमा कम्पनीच्या प्रतिनिधीने 5 हजार रु मागीतले. व तुमचे नुकसान अधिक दाखवतो असे म्हणाला आधीच नुकसानीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याने काही मागे पुढे न पाहता विमा प्रतिनिधींची धुलाई करणे सुरु केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित अढाऊ हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी पोहचले व कोणत्याही शेतकऱ्यांनी अधिकचे पैसे पीक विमा प्रतिनिधीला देऊ नये असे आवाहन केले. यावेळी विमा प्रतिनिधीने माफी मागत आम्हला वरच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात अशी कबुली दिली या वेळी आणखी एका अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलाविण्यात आल्यानंतर दोघांनाही शेतकऱ्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केले आता अधिक तपास पोलीस करीत आहे. मात्र या भोंगळ कारभाराकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा व दररोज आपल्या मोबाइलवरच वाचा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक