बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार!
ठाणे
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला, ज्यामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. तसेच, गोळीबारात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले .
पोलिसांच्या ट्रान्झिट रिमांड प्रक्रियेदरम्यान, अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. त्याने स्वतःवर गोळी झाडल्याची प्रारंभिक माहिती मिळाली होती, परंतु त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केला, असे सुत्रांकडून समजले. परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्या चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. तसेच, गोळीबारात जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.