हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचा सौम्य धक्का:केंद्रबिंदू नांदेडमध्ये,
सकाळी 6.52 वाजता 3.8 रिश्टर स्केलची नोंद, भीतीमुळे नागरिक घराबाहेर
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२ हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यातील काही गावांना मंगळवारी ता. 22 सकाळी 6.52मिनीटांनी भूकंपाचा धक्का जाणवला असून यामुळे नागरीकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू नांदेड असून त्या ठिकाणी 3.8 रिश्टर स्केलची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षात भूकंपाच्या धक्यांमधून वाढ झाली आहे. 2 रिश्टर स्केल पासून ते 3.8 रिश्टर स्केल पर्यंतचे भूकंप झाले आहेत. यापुर्वी रामेश्वरतांडा (ता. कळमनुरी ) केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरून गेला होता.
त्यानंतर आज सकाळी 6 वाजून 52मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमधून हे धक्के जाणवले असून पहाटेच्या या भूकंपामुळे नागरीकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड असून त्या ठिकाणी 3.8 रिश्टर स्केलची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. मात्र भूकंपामुळे कुठेही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्हयात वारंवार होणाऱ्या भूकंपाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक सुमारे चार महिन्यापूर्वी हिंगोली जिल्हयात सर्वेक्षण करून गेले होते. त्यांनी रामेश्वरतांडा सह परिसरातील गावांमधून तसेच वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये भेट देऊन पाहणी केली तसेच काही गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. मात्र या बाबतचा अहवाल अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला नाही. त्यामुळे हिंगोली जिल्हयाला या अहवालाची प्रतिक्षा लागली आहे.