लोकांना भटकविण्याचे काम करणाऱ्यांना चारही कोन चित करायचे आहे आणि ऑटोत बसून सर्वांनी मुंबईला जायचे – आ.बच्चू कडू
प्रीतीताई बंड या अपक्ष नव्हे तर सर्वपक्षीय उमेदवार
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१८ बडनेरा
डोक्यात जाती धर्माचे भूत घालून, हिंदू खतरे मै है… मुस्लिम खतरे में है… असे सांगायचे आणि राजकारण करायचे… आता खऱ्या अर्थाने नेते खतरे मे है… लोकांना भटकविण्याचे काम करणाऱ्यांना चारही कोन चित करायचे आहे आणि ऑटोत बसून सर्वांनी मुंबईला जायचे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. ते अपक्ष उमेदवार प्रिती बंड यांच्या बडनेरा येथील आठवडी बाजार येथे सोमवारला रात्री आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी बच्चू कडू यांनी चौफेर टोलेबाजी करीत भाजप-काँग्रेससह स्थानिक राजकारण्यांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल चढविला.
आज बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिन, तारीख १७…१७ नंबरवर ऑटो चिन्ह आणि आज सभेची तारीख
सुद्धा १७… काय योगायोग…! या ठिकाणी जमलेली गर्दी, तुम्हाला पाहून मी तर पागलच झालो, माझे डोके चक्रावले… जिकडे तिकडे लोकच लोक… इकडे निळे झेंडे… तिकडे भगवे… हिरवे…तर माझ्या गळ्यात पिवळा दुपट्टा….! असल्याचे सांगत आ. बच्चू कडूंनी आक्रमकपणे भाषणाची सुरुवात केली. आमची बहिण किसान, मजदुरांची वाघिण आहे… डुप्लिकेट नाही… पेट्रोल कुणाचे… घासलेट कुणाचे अन् गाडी कुणाची अन् बोंबलता कुणाच्या नावानं….! आम्हाला म्हणता खोके घेतले… असे तुम्ही किती ओके आहे, हे सर्वांना माहिती आहे. केवळ स्वार्थ साधण्यासाठी वापर सुरु आहे. आज कुठेही दलित, मुस्लिम भागातील पोस्टरवरून भाजप नेत्यांचे फोटो गायब आहेत आणि…. बडनेरातून गायब आहे… आम्ही लोक काही एवढे मॅट नाही…. आता सर्वांना कळून चुकले बरेच झाले प्रिती ताईंना ऑटो मिळाला… आता या ऑटोने धक्का
बसल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले की संविधानासोबत यांचे काय नाते आहे. कुणी कायदा पायदडी तुडविण्याचे काम करीत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा उभारून चालणार नाही तर त्यांचे विचार, संविधान डोक्यात पाहिजे, असे यावेळी बच्चू कडू म्हणाले. आपल्या बोटात हत्तीचे बळ आहे… त्याचा उपयोग प्रितीताई बंड यांचे १७ व्या नंबरचे ऑटो चिन्हाचे बटन दाबून करायचा आहे. कारण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची, श्रीमंत विरुद्ध गरीबाची आहे. सर्वांनी सभेची गर्दी पाहून स्वस्थ बसायचे नाही. तर येत्या दोन दिवसात सर्वांनी कामाला लागून प्रितीताई बंड यांना विजयी करायचे आहे. सर्वांना ऑटोत बसून मुंबईला जावून रेकॉर्ड करायचे आहे, असे आवाहन बच्चू कडू यांनी शेवटी केले.
अभूतपूर्व सभा
बडनेरातील आठवडी बाजार परीसरात यापूर्वी उद्धव ठाकरेंची सभा झाली होती. मात्र ही सभा महाविकास आघाडीच्या उमेदवाराची होती. एका अपक्ष उमेदवाराच्या सभेसाठी झालेली गर्दी पाहता, अभूतपूर्व रेकॉर्ड ब्रेक गर्दी सभेला झाल्याचे चित्र दिसत होते. या सभेला व्यासपीठावर माजी आ. ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बनसोड, दिनेश बूब, वसु महाराज, बंटी रामटेके, नाना नागमोते, नितीन मोहोड, आशिष धर्माळे, जितू दुधाने, संजय देशमुख, प्रवीण अळसपुरे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ही लढाई माझी एकटीची नसून आपणा सर्वांची आहे. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. आज मी एकटी नसून येथे बसलेले हजारो भाऊ, बहिणी, माता, पिता, युवक, युवती सर्व माझ्या पाठिशी आहे. मी आता अपक्ष नसून सर्व जनतेची उमेदवार आहे, असे मत यावेळी प्रितीताई बंड यांनी व्यक्त केले. प्रितीताई बंड यांच्या सभेदरम्यान आंबेडकरी चळवळीतील, तसेच मुस्लिम समाज,ऑटोरिक्षा संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी आपला पाठिंबा या वेळी जाहीर केला.
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचण्यासाठी आमच्या साईड ला भेट द्या !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !