बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा निर्णय
विदर्भ प्रजासत्ताक
प्रवासादरम्यान आपण बऱ्याचदा बाटलीबंद पाणी खरेदी करतो. घराबाहेर पडताना घरातील पाण्याची बाटली विसरून निघालो तर बाहेर पाण्याची बाटली खरेदी करतो. या बाटलीबंद पाण्याला ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर’ असं संबोधलं जातं. हे पाणी शुद्ध आहे असं आपण मानतो. काही कंपन्या दावा करतात की त्यांनी यात मिनरल्स (नैसर्गिक द्रव्ययुक्त पाणी) मिसळले आहेत. या पाण्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, असं आपण मानतो. अनेक घरांमध्ये पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी हेच पाणी विकत घेऊन वापरलं जातं. परंतु, बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांसाठी आणि हे पाणी विकणाऱ्या कंपन्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने म्हटलं आहे की हे पाणी आपल्यासाठी घातक ठरू शकतं. एफएसएसएआयने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटरचं अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण केलं आहे. त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणं अनिवार्य आहे. तसेच या पाण्याचं व ते पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिटही (तपाणसी) केलं जाणार आहे.
अलीकडेच केंद्र सरकारने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून (बीआयएस) दिलं जाणारं प्रमाणपत्र मिळवण्याची अनिवार्य अट रद्द केली आहे. त्यानंतर एफएसएसएआयने हा नवीन निर्णय घेतला आहे. हा निर्णय पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर विक्रेत्या कंपन्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एफएसएसएआयने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार आता सर्व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उत्पादकांना एफएसएसएआयच्या वार्षिक तपासण्यांना (ऑडिट) सामोरं जावं लागेल. कोणत्याही कंपनीला परवाना मिळवण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी करून घ्यावी लागेल.
कंपन्यांना तपासण्या करून घ्याव्या लागणार
एफएसएसएआयने दिलेल्या आदेशांनुसार सर्व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटर उत्पादनांना अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकृत केलं आहे. तसेच या उत्पादकांना आता एफएसएसएआयचं प्रमाणपत्र घ्यावं लागेल. त्याचबरोबर थर्ड पार्टी अन्न सुरक्षा संस्थांकडून वार्षिक ऑडिट करून घ्यावं लागेल.
या निर्णयाचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
हा सर्व खटाटोप करण्यामागे सरकारचं एकमेव उद्दीष्ट आहे की सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावं, लोकांनी खरोखर मिनरल वॉटर मिळावं. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मिनरल वॉटरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा व दर्जा सुधारणं हे सरकारचं उद्दीष्ट आहे. लोकांना सुरक्षित गोष्टी मिळाव्यात व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने सरकारने हे नवे बदल केले आहेत.