रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चाय पे चर्चा होणार ?
अमरावतीत गरम चहामुळे राजकीय वातावरण तापलं !
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१३अमरावती
माझ्या निवास्थानावर बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना चहा प्यायला आमंत्रण देण्यासाठी मी तयार आहे. किंवा त्यांच्या घरी जाऊन चहा घ्यायला तयार आहे. जिल्ह्यातील कोणताही नेत्यासोबत माझं वैर नाही, असं वक्तव्य आमदार रवि राणा यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात केलंय. त्यांच्या या विधानाला माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलंय.
युवा स्वाभिमान पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी केलेल्या
वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या जिल्ह्यातील कोणताही नेता रवी राणाचा दुश्मन नाही. किंवा मतभेद नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी मला चहा प्यायला बोलावलं तर, मी त्यांच्या घरी जायला तयार आहे, असं रवि राणा म्हणाले आहेत.
रवि राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनभेद आणि मतभेद यात फरक आहे. मनभेद होण्यासाठी थोडा वेळ लागेल तर, चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू. नंतर चहा घेऊ. रवी राणा आणि आमचा कायमचा वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही. याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कधी आडवे आलो नाही, असंही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. त्यामुळे रवी राणा यांच्या वक्तव्यानतंर यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू या तीन नेत्यांमध्ये मैत्री होईल का ? तिन्ही नेते एकत्र चहासाठी भेटतील का? अशा प्रश्नांसह राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.