
..आणि न्यायमूर्तीचे हेलिकॉप्टर भरकटले
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०धारणी :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी धारणी येथे विधी सेवा महाशिबिराला उपस्थित राहण्यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने रविवारी उड्डाण केले. मेळघाटात प्रवेश करताच नेटवर्क कनेक्टिव्हिटी खंडित झाल्याने पायलटसह धारणीतील आयोजकांची पाच ते सात मिनिटे भंबेरी उडाली. हेलिकॉप्टर लैंड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रविवारी सकाळी ११ च्या सुमारास नागपूरहून निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्या. अतुल चांदूरकर, न्या. रेवती डेरे, न्या. वासुदेव सांबरे यामध्ये होते. मेळघाट जंगल परिसरात आल्यानंतर अचानक हेलिकॉप्टरची नेटवर्क कनेक्टिव्हिटी गेली. त्यामुळे पाच ते सात मिनिटे हेलिकॉप्टर भरकटले आणि सर्वांना घाम फुटला. काही काळ हवेत घिरट्या घातल्यानंतर चॉपरला नियोजित मार्ग मिळाल्यानंतर ते धारणी मार्गावर आले आणि सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला,अशी माहिती स्वतः न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यांच्यापूर्वीच कारने धारणी गाठले होते.

पोलिसांचे केले कौतुक
कार्यक्रम झाल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सभास्थळी लावण्यात आलेल्या ४० स्टॉलना भेट दिली. यावेळी पोलिस ठाण्याच्या स्टॉलसमोर आले असता, ठाणेदार अशोक जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांच्यासमक्ष आल्यानंतर त्यांनी लावण्यात आलेल्या सूचना फलकाचे अवलोकन केले आणि माहिती घेतली.


