२५० ग्राहकांचा पाणीपुरवठा होणार खंडित
जिल्हा रुग्णालय, कारागृहासारख्या शासकीय कार्यालयांनाही नोटीस
मजीप्राच्या १,५०० ग्राहकांना कारवाईचा ‘अल्टिमेटम’
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती :
चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणीपट्टी देयक वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रातील ग्राहकांकडे तब्बल ४५० कोटी रुपयांचे देयक थकीत असल्याने पाणीपुरवठा योजना कशी चालवायची, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे गत दीड ते दोन महिन्यांत सुमारे दीड हजार नळजोडणीधारकांना नोटीस देण्यात आल्या असून, त्यापैकी २५० पेक्षा अधिक नळजोडणीचारकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रात एकूण १ लाख २ हजार ४१६ नळजोडणीधारक आहे. सिंभोरा धरणापासून ५५ किमी अंतरावरील अमरावती शहरापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी आणणे, त्यानंतर जलशुद्धीकरण करून २५ पाणीटाक्यांद्वारे प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविणे आदी प्रक्रियेसाठी वार्षिक ३६ कोटी रुपयांचा खर्च येतो. त्या तुलनेत आतापर्यंत सुमारे २४ कोटी रुपयेच वसूल झाले आहे. याचाच अर्थ १२ कोटी रुपयांनी ही योजना तोट्यात आहे. याशिवाय ग्राहकांकडील जुन्या थकबाकीचा आकडा वेगळाच आहे. त्यातच आर्थिक वर्ष २०२४-२५ संपायला जेमतेम दीड महिना शिल्लक आहे.

एवढ्या कमी कालावधीत पाणीपट्टी देयक वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांच्या नळजोडण्या खंडीत करणे, ९० टक्के थकबाकीदार ग्राहक असलेल्या भागातील संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच अवैध नळजोडणीधारकांनी पंडासह नळजोडणी वैध करून न घेतल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे २५० थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मजीप्राचे उपअभियंता संजय लेवरकर यांनी दिली.