
जिल्ह्यात 10 वी, 12 वीच्या 74,252 विद्यार्थ्यांसाठी केवळ 1 समुपदेशक !
एक समुपदेशक कुठे कुठे पुरणार, पालक, विद्यार्थ्यांचा प्रश्न
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्दारे मंगळवार, ११ फेब्रुवारीला बारावी व २१ तारखेडा दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार, कठीण विषयांची भीती, तणाव व नैराश्याने ग्रासलेले असतात. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती केली जातेः मात्र अमरावती जिल्ह्यात दहावी व बारावीचे एकूण ७४ हजार २५२ विद्यार्थी परीक्षा देणार असले, तरी केवळ एकाच समुपदेशकांकडे या एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपवण्यात आली.
त्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळते की काय, अशा परखड प्रतिक्रिया पालकांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. बोर्ड केवळ कागदी घोडे नाचवत शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचा देखावा तर करत नाही, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. राज्य शिक्षण मंडळाव्दारे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १९ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे.

जिल्ह्यातून बारावीचे एकूण ३६ हजार ३१ विद्यार्थी १३९ केंद्रावरून, तर दहावीचे ३८ हजार २२१ विद्यार्थी १९६ केंद्रावरुन परीक्षा देणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विभागीय मंडळाव्दारे एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मागील महिनाभरात दहावीच्या १६०, तर बारावीच्या जवळपास ७५ अशा सुमारे २३६ विद्यार्थ्यांचे समपदेशन केले आहे.

दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या आमच्या मुलांना परीक्षेची भीती वाढत असल्याने ते दडपणाखाली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे. बोर्डाव्दारे समुपदेशक नियुक्त करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांच्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी मुलांचे समुपदेशन केले; परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास बराच वेळ गेला.

एकापेक्षा जास्त समुपदेशक नियुक्त केले, तर विद्यार्थ्यांसह पालकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोईचे होईल, अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्यात.