
विद्यापीठातील संस्कृत विभागामध्ये वेदोत्सव कार्यक्रम संपन्न
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती
भारतीय संस्कृती ही ज्ञानप्रीय तसेच उत्सवप्रीय संस्कृती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी भारतीयांनी पूर्वी अनंत काळापासून सदैव शास्त्राध्ययनाची परंपरा जोपासली आहे. वेद, उपनिषद, पुराणवाङ्मय तसेच महाकाव्य, कथा, नाटके यांसारख्या साहित्यग्रंथांचा व्यासंग जोपासलेला आहे. याच अनुषंगाने वसंत पंचमीचे औचित्य साधून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर संस्कृत विभाग व संस्कृत भारती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विभागामध्ये वेदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील वसंतराव नाईक ज्ञान व समाजविज्ञान संस्थेमधील सहायक आचार्य डॉ. पल्लवी कर्वे, संस्कृत भारतीचे विदर्भ प्रांताधिकारी श्री देवदत्त कुलकर्णी, जनपद कार्याधिकारी प्रा. उल्हास बपोरीकर, संस्कृत विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी आचार्य डॉ. पल्लवी कर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनातून ज्ञानपरंरेचे अनेक पैलू उलगडून दाखविले. संशोधन विषयक उपलब्धता आणि आवश्यकता समजावून सांगतांना माता सरस्वती ही संशोधन प्रस्तुतीची देवी असल्याचे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, वेद हे आपल्याला अहितापासून दूर करुन आपल्या हिताचा मार्ग दाखवते असे सांगून त्यांनी वेदोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विभाग समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांनी वेदोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला संस्कृत विभाग देखील भारतीय ज्ञान परंपरेमध्ये भूमिका निभावत असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यावारिधि डॉ. राहुल लोधा यांचे छंदप्रवेशिका तसेच संस्कृत शिक्षिका अनुराधा शर्मा यांचे भगवद्गीता परिचय या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. संस्कृत विभागामार्फत घेण्यात आलेल्या संस्कृत भाषा व बोधन वर्गातील उत्तीर्ण विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सरस्वती शिशू वाटिका किरणनगर, अमरावती येथील बाल केंद्रातील विद्यार्थी मीरा भेरडे, भार्गव लोधा, राम जोशी, वेदांत क्षीरसागर, अथिरा मोरोणे, कृष्ण पांडे, सात्विक जोशी यांनी सरस्वती वंदना प्रस्तुत केली. विद्यार्थी अथर्व जोशी याने वैदिक स्तवन तसेच वैदिक स्वस्तीवाचन केले.
विद्यार्थिनी अमृता कोरडे हिने संस्कृत स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक प्रा. स्वप्ना यावले, पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रियंका मोहोड यांनी, सूत्रसंचालन डॉ. राहुल लोधा यांनी तर आभार प्रा. श्वेता बडगुजर यांनी मानले.शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.