
चिंता नको……. सिंचन प्रकल्पांत ६ ३ टक्के जलसाठा
प्रकल्पांच्या क्षेत्रात मुबलक पाणीसाठा: सिंचनालाही कमी मागणी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती
उन्हाळा सुरू झाला असताना व पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पोहोचण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा ही समाधानकारक बाब मानली जात आहे. गत हंगामात झालेल्या पावसाची सरासरी यासाठी कारणीभूत असून सिंचनासाठी पाण्याची कमी मागणी झाल्याने प्रकल्पांमध्ये जलसाठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे.

जिल्ह्यात अप्परवर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघुप्रकल्प आहेत. विद्यमान स्थितीत ५६ सिंचन प्रकल्पांत ६६६ दलघमी (६३ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. अप्परवर्धा प्रकल्पात ३८३ दलघमी साठा ‘असल्याने अमरावती शहरासह या प्रकल्पावर अवलंबिलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे, तर सात मध्यम प्रकल्पांत प्रकल्पीय सिंचन क्षमतेच्या तुलनेत १५० दलघमी साठा आहे. लघुप्रकल्पांपैकी काही प्रकल्प उन्हाळ्यात तळ गाठतात. सद्यस्थितीत या ४८ प्रकल्पांत १३३ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

पाणीटंचाईच्या झळा प्रामुख्याने लघुप्रकल्पांच्या क्षेत्रात जाणवण्याची शक्यता आहे. गत हंगामात पावसाने चांगली हजेरी लावत सरासरी गाठल्याने सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा होऊ शकला. पाऊस सार्वत्रिक झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीतही वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

याचा परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनासाठीच्या पाण्यावर झाला. यंदा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सिंचनासाठी पाण्याची तुलनेने मागणी कमी झाली आहे. प्रकल्पातील पाण्याचा उठाव कमी’ झाल्याने पाणीपातळी कमी झाली नाही.