
दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या लागणार, विद्यार्थ्यांची वाढली धाकधुक –
अमरावती
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ कोणत्या वेबसाईवर पाहता येईल?
• mahresult.nic.in
• digilocker.gov.in
• mahahsscboard.in
निकालाची प्रिंट कशी काढावी?
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा परीक्षा क्रमांक आणि जन्मतारीख तेथे भरा. तुमचा निकाल पाहण्यासाठी ‘सबमिट’ वर क्लिक करा. त्यानंतर डाउनलोड पर्याय निवडून निकालाची प्रिंटआउट घ्या.
५,१३० मुख्य केंद्रांवर घेतली होती परीक्षा- राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेली दहावीची परीक्षा यंदा १० दिवस आधीच नियोजित करण्यात आली होती. यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार १५ मेपूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं होतं. यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६,११,६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ८,६४,१२० मुले, ७,४७,४७१ मुली आहेत आणि १९ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. संपूर्ण राज्यात ५,१३० मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज सुविधा- ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी ऑनलाईन करता येणार आहे. तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करता येतील. त्यासाठीच्या आवश्यक अटी, शर्ती आणि सूचना एसएससी बोर्डाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत.
१५ मेपासून पुनर्परीक्षेसाठी करता येणार अर्ज – जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार आणि खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठीची माहिती स्वतंत्र परिपत्रकातून देण्यात येणार आहे.