
मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल:12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा;
यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार पाऊस राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे.
दरवर्षी साधारणतः 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला.
आज 25 मे 2025 रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे.
मान्सूनची उत्तर सीमा 15.5°N/55°E, 15.5°N/60°E, 16°N/65°E, 16.5°N/70°E, देवगड, बेलागावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, 15°N/83°E, 18°N/87°E, 20°N/89°E, ऐझवाल, कोहिमा, 26.5°N/95°E, 27°N/97°E.पुढील 3 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून 107 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.
1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सून
मान्सून लवकर किंवा उशिराचा पावसावर परिणाम होत नाही. फक्त 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो. गेल्या 50 वर्षांत, मान्सून नियोजित तारखेला म्हणजे 1 जून रोजी फक्त तीनदा दाखल झाला. 25 वेळा तो 1 ते 12 दिवस आधी आला आहे. 22 वेळा तो उशिरा आला आहे. 2009 मध्ये, जेव्हा मान्सून 23 मे रोजी आला तेव्हा फक्त 78% पाऊस पडला. 2009 मध्ये मान्सून 13 जून रोजी आला होता, पण त्या वर्षी 102% पाऊस पडला होता.
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ! व वाचत रहा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
तुम्ही पण तुमच्या लोकप्रिय ब्रँड ची जाहिरात आमच्या सोबत करू शकता मो. ८६०५९४८८५३