
एसटीची दुचाकीला जबर धडक,पत्नी ठार,पतीसह एकजण जखमी
पिंपळविहीर नजीकची घटना,लिफ्ट घेणे पडले महागात
नांदगाव पेठ
नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या भरधाव एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक महिला ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.७ जुलै) दुपारी दीड वाजताच्या दरम्यान पिंपळविहीर या गावाजवळ घडली.विजया राजेश पवार (२८) रा. शेंदोळा असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून राजेश कमलबाबू पवार (वय ४१, रा. शेंदोळा, जि. अमरावती) व शेख मुख्तार मोहम्मद शमीम (रा. ललतपूर, जि. वैशाली, बिहार) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची हकीकत अशी की,राजेश पवार व त्यांची पत्नी विजया हे दोघेही शेंदोळा फाट्यावरून अमरावती कडे येत असतांना त्यांनी दुचाकी क्रमांक एम.एच.२७ पी.क्यू ०२०३ या दुचाकी चालकाला थांबवून अमरावती पर्यंत लिफ्ट मागितली. दुचाकी चालक शेख मुख्तार मोहम्मद शमीम याने दुचाकीवर दोघांना बसवून घेतले आणि तिघेही अमरावती कडे निघाले असतांना मागून येणाऱ्या चिमूर अमरावती बस क्र. एम.एच.४०,सी एम.४४१८ ने पिंपळविहिर नजीक दुचाकीला मागून धडक दिली.या अपघातात मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली तर महिलेचा पती राजेश व दुचाकी चालक शेख मुख्तार मोहम्मद शमीम हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच विजया पवार यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय चमूने सांगितले.नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट व सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा !!