
मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोट प्रकरण …
अमरावती कारागृहात बंदिस्त चार आरोपींची सुटका
नातेवाईकांसह रात्रीच मुंबईला रवाना
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२२अमरावती
मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील संशयीत आरोपी तनवीर अहमद मोहम्मद इब्राहीम अन्सारी, मोहम्मद माजीद मोहम्मद शफी, सोहेल मोहम्मद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख हे चार जण ३० सप्टेंबर २०१५ पासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. २०१९ मध्ये त्यांनी अपील अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून त्याचे वकील अॅड. तंबोली, अॅड. युग युग चौधरी, अॅड. वहाब खान, अॅड शाहिद नदीम आणि अमरातीच्या अॅड. सिमी शेख यांनी सतत पाठपुरावा केला. यादरम्यान अॅड. सिमी शेख यांनी २०१९ ते २०२१ पर्यंत संशयीत आरोपींची वेळोवेळी मुलाखत घेत होत्या. दरम्यान सोमवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. त्यानंतर चारही जण रात्रीच आपल्या नातेवाईकांसमवेत मुंबईला रवाना झाले.
आज आम्ही २० वर्षानंतर सुटलो आहे. आमचा देवावर आणि न्यायालयावर खूप विश्वास आहे. आमचा कुठलाही दोष नव्हता आम्ही सत्र न्यायालयातून सुटणार होते परंतु आम्ही येथून सुटलो. त्यामुळे न्यायाधीश व आमच्या वकिलांचे आभार मानतो. माझ्यावर सीमीसोबत संबंध असल्याचा आरोप होता. परंतू तसे काही नव्हते ती खूप जुनी घटना आहे. सरकारकडे आमची कुठलीच मागणी नाही, असे निर्दोष सुटलेल्या सोहेल मोहम्मद शेख यांनी सांगितले.
बॉम्ब स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्याची माहित पडताच चारही संशयीत आरोर्पीचे नातेवाईक अमरावतीला आले होते. सायंकाळी ७.४० वाजता चारही जण कारागृहातून बाहेर येताच त्यांनी त्याच्या वकिल अॅड सिमी शेख यांची भेट घेतली व लगेचच मुबंई कडे रवाना झालेत.