
चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडूंवर अप्रत्यक्ष टीका; ‘नौटंकी करून काही मिळणार नाही’
विदर्भ प्रजासत्ताक
दि.४मोर्शी,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोर्शी येथील एका कार्यक्रमात विना नावाचा उल्लेख करत अपक्ष आमदार बच्चू कडूंवर अप्रत्यक्ष टीका केली. “काही लोक नौटंकी करतात, आंदोलनं करतात, फ्रॉमहाऊस बांधतात, मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात आणि मग कर्जमाफीसाठी समितीची मागणी करतात,” असे वक्तव्य करत त्यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला.

बावनकुळे म्हणाले, “अमरावतीत अनेकांनी आंदोलनं केली, नौटंकी केली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही गदारोळाशिवाय दिव्यांगांसाठीचा भत्ता 1500 रुपयांवरून थेट 2500 रुपये केला.” यामधून त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर भर देत, विरोधकांच्या आंदोलनात्मक शैलीवर टीका केली.
ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर आहे. पण काही लोक शेतात फ्रॉमहाऊस बांधतात, नंतर कर्जमाफी मागतात. त्यामुळे अशांसाठी समिती तयार करण्यात आली आहे.” हे बोलताना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरी बच्चू कडू यांना उद्देशूनच ही टीका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे मोर्शीतील राजकीय वातावरण तापले असून, यावर बच्चू कडू काय प्रत्युत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
