
मोर्शीत मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
हत्ती प्रकरणात शासनाची भूमिका नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांच्या विधानाचाही बचाव; मेघना बोर्डीकर यांच्याशी संवाद झाल्याचेही स्पष्ट
अमरावती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील गजराज (हत्ती) प्रकरणावर तसेच आमदार संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर यांच्याशी संबंधित वादग्रस्त विधानांवर स्पष्ट भूमिका मांडली. अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्या राज्यात चर्चेत असलेल्या या तिन्ही मुद्द्यांवर सरकारचा अधिकृत दृष्टिकोन मांडला.
कोल्हापुरातील मंदिर परिसरातून हत्ती हलविण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री म्हणाले,हत्ती नेण्यासंदर्भात शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही तक्रारी झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या प्रकरणात एक हायपॉवर समिती नियुक्त केली होती. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात निर्णय गेला आणि न्यायालयाने तो आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्य शासनाची या प्रकरणात कुठलीही थेट भूमिका नाही.”
मुख्यमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की,भाविकांच्या भावना आम्हाला महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच मंगळवारी आमदारांसोबत या प्रकरणावर बैठक बोलावली आहे.”
शिरसाट यांच्या विधानावर बचावात्मक भूमिका
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले,मंत्री कधी कधी भाषणात गमतीने काही बोलतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही. शिरसाट यांनी जे काही म्हटले, ते मला तरी चुकीचे वाटत नाही. मात्र, अशा वक्तव्यांबाबत संयम ठेवावा, असा सल्ला मी त्यांना दिला आहे.”या विधानातून मुख्यमंत्री शिरसाट यांना थेट पाठीशी घालताना दिसले, मात्र सार्वजनिक वक्तव्य करताना काळजी घेण्याची सूचनाही दिली.
मेघना बोर्डीकर यांच्याशी संवाद; मीडिया रिपोर्टिंगवर टीका
भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं आहे. त्यांच्या विधानाचं जे मीडिया रिपोर्टिंग झालं, ते अर्धवट आणि दिशाभूल करणारं आहे.”फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे माध्यमांच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
सरकारचा स्पष्ट दृष्टिकोन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणामुळे राज्यात गाजत असलेल्या तीनही विषयांवर – म्हणजे हत्ती हलविण्याचा वाद, शिरसाट यांचे विधान, आणि बोर्डीकर यांचे वक्तव्य – सरकारची अधिकृत आणि स्पष्ट भूमिका समोर आली आहे.
राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्र्यांनी सामंजस्यपूर्ण आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.