
सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, फोन करून थेट तारीखच सांगितली…!!
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचा मेल पाठविण्यात आला होता. धमकीच्या या मेलमुळे खळबळ माजली होती. त्यानंतर लगेच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सलमानला धमकीचा फोन आला आहे. काल १० एप्रिलला सलमानने त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला खुद्द सलमान हजर होता. ट्रेलर लॉन्चच्या रात्रीच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये सलमानला जीवे मारण्याचा धमकीचा कॉल आला. मी जोधपूरचा गोरक्षक रॉकी भाई बोलत असल्याचं कॉलरने सांगितलं.
रिपोर्टनुसार, काल रात्री ९ च्या सुमारास मुंबई पोलिसांना जोधपूरहून धमकीचा फोन आला होता. “३० एप्रिलला सलमान खानची हत्या करू, त्याला संपवून टाकू” अशी धमकी कॉलरने दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याआधी गेल्या १८ मार्चला सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला धमकीचा मेल आला होता. ज्यात सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. रोहित गर्ग नावानं हा मेल आला होता. गोल्डू बरारला तुझ्या बॉसबरोबर बोलायचं आहे. त्याने इंटरव्ह्यू पाहिला असेल वाटतं. नसेल त्याला पाहायला सांग. मॅटर क्लोज करायचा आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर बोलणं करून दे. समोरासमोर बोलायचं असेल तर तसंही सांग. आधीच इन्फॉर्म केलं आहे. दुसऱ्या वेळेत थेट झटका मिळेल, असं या मेलमध्ये लिहिलं होतं. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मार्च महिन्यात तुरुंगातून एबीपी न्यूजला मुलाखत दिली होती.