पितामह… आपले हे वागणे अशोभनीयच…
गेल्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा आपण भरपावसात सशक्त अशा भाजपला आव्हान दिले, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने आपल्यातील जिद्दीला सलाम केला. भाजपची सत्ता रथयात्रा रोखण्याचे कामही आपणच केले. ‘तेल लावलेला पैलवान’ अशी आपली ओळख. विरोधकांच्या तावडीत कधीही न अडकणारे असा आपला बाणा. आपण आज भिष्म पितामहाच्या भूमिकेत शोभून दिसता. पण, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांना काहीतरी तात्कालिक निमित्त आवश्यक होते, ते अदानी प्रकरणामुळे मिळाले होते. पंतप्रधान मोदी यांनी अदानींवरील आरोपांबाबत अवाक्षरही न काढल्याने आणि संयुक्त संसदीय समितीची नियुक्ती करण्यासही नकार दिल्याने हे ‘निमित्त’ अधिकच मजबूत होऊ लागले होते. पण, अचानक आपण अदानींची बाजू घेतली आणि भाजप विरोधकांच्या एकजुटीतील हवा काढून घेतली. असे करणे योग्य होते का? असा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून अनेक वेळा पवारांचे राजकारण संपल्याची चर्चा करण्यात आली. परंतु अशा प्रत्येक वेळेला चकवा देऊन पवार पुढे निघून गेले. भाजपची ताकद वाढत असताना आणि बाकी कुठलाच पक्ष त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे वातावरण असताना शरद पवार निर्धाराने मैदानात उतरले. सव्वादोनशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीने आघाडी घेतल्याचे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले होते. वा-याची दिशा ओळखून त्यानंतरही अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसना मिळून पस्तीसेक जागा मिळतील, असे अंदाज सगळ्या वाहिन्यांवरून व्यक्त केले जात होते. काँग्रेसने तर निवडणूकच सोडून दिली होती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ऐंशीच्या घरातले शरद पवार निर्धाराने मैदानात उतरले. सगळ्या लढाया संख्याबळावर जिंकता येतात, हा समज खोटा ठरवला. प्रचाराचे रान उठवून दोन्ही काँग्रेसची ताकद नव्वदच्या घरात नेली. आणि मग १०५ जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा डाव खेळले. कमी जागा जिंकूनही एकेका राज्याची सत्ता काबीज करीत सुटलेल्या भाजपला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर ठेवण्याची किमया पवारांनी महाराष्ट्रात घडवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.
भाजपला नमवता येते, हा संदेश त्यामुळे देशभर गेला. ऐंशीच्या उंबरठ्यावरून निवृत्तीकडे वाटचाल करण्याऐवजी शरद पवार यांनी नवी इनिंग सुरू केली आहे. त्यांचा उत्साह समोरच्या माणसांमध्ये ऊर्जा निर्माण करतो. खरेतर पवारांना आता कोणत्याही सत्तापदाचे अप्रूप नसावे. कारण शरद पवार हाच ब्रँड कोणत्याही पदापेक्षा मोठा बनला आहे.
आता हिंडेनबर्गचे नावही आधी ऐकले नव्हते, अदानींना टार्गेट केले जात आहे वगैरे सांगून शरद पवार यांनी विरोधकांच्या अपेक्षित ऐक्याच्या खडतर मार्गात चांगलेच अडथळे निर्माण केले आहेत. अदानींवर बोलण्यासाठी पवारांनी आताचाच मुहूर्त का निवडला याचे कोडे अजून उलगडेलेले नाही. राहुल गांधी या प्रश्नावर रान उठवत असताना पवार भलत्याच दिशेने जाऊन भाजपला निसटून जाण्याची संधी का मिळवून देत आहेत, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
यापुर्वीही अनेकवेळा पवारांनी अनाकलनीय अशी भूमिका घेतली आहे. २०१४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपला सर्वाधिक १२३ जागा तर शिवसेनेला ६३, काँग्रेसला ४२ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्ता स्थापनेसाठी २२ जागा कमी पडत होत्या. त्यावेळी, ‘महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात स्थिर सरकार यावे,’ असे म्हणत शरद पवार यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. भाजप बहुमतासाठी आपला पक्ष फोडेल, अशी शक्यता पवारांना दिसली असावी. म्हणून भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला, असे त्यावेळी बोलले गेले. पण, आता परिस्थिती बदलली आहे. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना संधी मिळाली आहे. खरेतर राष्ट्रीय पातळीवरील जाणत्या नेत्यांनी युपीएच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. विरोधक मजबूत झाले आणि त्यामुळे भाजपला आव्हान देता आले तर त्याचा सर्वाधिक फायदा भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच होणार आहे.
मात्र आता पवारांनी घेतलेल्या भूमिकेमागे काय दडले आहे, याची उत्तरे पवार समर्थकांना द्यावी लागणार आहेत.
नितीन देशमुख, अमरावती.