पुरोगामी विचारांनी पार पडला अंतिम संस्कार
पारंपरिक रुढी व विधींना फाटा देत देहदान करुन बिजेवार गुरुजींनी ठेवला आदर्श-
अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनवाडी येथील आदर्श शिक्षक जयसिंग बिजेवार गुरुजींचे वयाच्या ७८ व्या वर्षी काल सांयकाळ दि.१७ ला निधन झाले.बिजेवार गुरुजी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते होते.ते आधुनिक पुरोगामी विचारांचे कृतीशील प्रचारक होते.त्यांच्या धनवाडी गावात ते नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवित होते.त्यांच्या सामाजिक कार्याला त्यांची दोन्ही मुले धनराज व तिर्थराज तसेच संपूर्ण कुटूंबियांचा नेहमीच पाठींबा होता,
बिजेवार गुरुजी यांनी १९९६ सालीच देहदानाचा संकल्प केलेला होता.त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार आज डाॕ.पंजाबराव देशमुख मेडिकल काॕलेज अमरावतीला त्यांचे देहदान करण्यात आले.यावेळी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेनुसार सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले.सुरुवातीला गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भजने सादर केली.त्यानंतर ग्रामगीतेमधील “अंत्यसंस्कार”या अध्यायाचे विजय बोके यांनी वाचन केले,नंतर माजी आमदार रमेश बुंदीले यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजलीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी तेल्हाऱ्याच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर,कट्यारमल गुरुजी,रमेश पांडे,मनोहर साळकर,खाडे गुरुजी यांची समयोचीत भाषणे झाली.त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जिजाऊ वंदना सादर केली.यावेळी कुटूंबातील महिलांनी पार्थिवाला खांदा देवून व अंत्ययात्रेत सहभागी होवून पारंपरिक विचारांना फाटा देत पुरोगामी विचारांचे आचरण केले व समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.सामुहिक राष्ट्रवंदना घेवून उपस्थितानी साश्रुपुर्ण नयनांनी पार्थिव पंजाबराव मेडिकल काॕलेजला सुपूर्द करण्यात आले.या अंत्यवीधी व देहदानाचे नियोजनास बिजेवार गुरुजींचे निकटस्थ डाॕ.नरेंद्र तराळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
@ विदर्भ प्रजासत्ताक