*गुरुदेव भक्तांची आज गुरुकुंजात मांदियाळी*
मौन श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम आज, विदेशी नागरिकसुद्धा होणार सहभागी
गुरुकुंज मोझरी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या क्रांतदर्शी महापुरुषाला गुरुवारी (ता. दोन) दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण मौनश्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सर्वधर्मीय प्रार्थना व शांततेसाठी संकल्प केला जाणार आहे. मौन श्रद्धांजलीच्या वेळी मुख्य मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात येणार असून संपूर्ण दुकाने काही वेळाकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. निरव शांततेत ज्याला ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथेच थांबून गुरुदेव भाविक राष्ट्रसंतांना आदरांजली वाहणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अश्विन वद्य पंचमी हा पुण्यतिथीदिन असून शके १८९० मध्ये महाराजांचे याच दिवशी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी महानिर्वाण झाले.होते. राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंजात मोठी यात्रा भरते. त्याच बरोबर या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन वैचारिक प्रबोधन केले जाते. मौन श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाकरिता देशभरातील साधुसंत, विद्वान, प्रचारक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व राज्यातील भाविक मंडळी पालखी दिंड्यासह गुरुकुंज आश्रमात येतात. पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा सर्वात महत्वाचा असतो. मौन श्रद्धांजलीच्याच दिवशी सर्वसंत स्मृती व मानवतादिन म्हणून साजरा करण्यात येतो. मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला दुपारी ३.३० मिनिटांनी सुरुवात होणार असून याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन कार्य आणि विचार लाखो भाविकांना भजन व निवेदनाद्वारे सांगण्यात येतात. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना, सामुदायिक प्रार्थनासुद्धा अतिशय भावपूर्ण वातावरणात होणार आहे.