नवनीत राणा यांचे आवाहन -भाजपा कार्यालयात जंगी स्वागत
अमरावती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारसौपार हा नारा दिला आहे. त्यात अमरावतीच्या जागेचाही सहभाग असावा, यासाठी आपल्याला कमळ फुलविण्याचा पक्का निर्धार करावा लागेल, असे आवाहन भाजपाच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार खा. नवनीत राणा यांनी केले.
भाजपात प्रवेश व उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच भाजपाच्या राजापेठ येथील कार्यालयात शनिवारी सांयकाळी आल्या होत्या. यावेळी त्यांचे जंगी स्वागत भाजपा नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे, शहराध्यक्ष आ. प्रवीण पोटे, भाजपा सचिव जयंत डेहनकर, निवेदिता चौधरी, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, शिवराय कुळकर्णी, किरण महल्ले यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. नवनीत पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच माझ्यारूपाने अमरावतीत कमळाचा उमेदवार उभा राहणार आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला विजयी करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही प्रामाणीक प्रयत्न करणार, हा विश्वास मला आहे. आ. पोटे म्हणाले, कमळ या चिन्हावर उभा राहणारा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी भाजपा कार्यकर्त्यांची आहे. जे मतभेद होते, ते दूर झाले असून सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करून नवनीत यांच्या विजयासाठी काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. खा. बोंडे यांनी नवनीत यांच्या विजयासाठी भाजपाचा प्रत्येक नेता व कार्यकर्ता कटिबद्ध आहे. मोदींचे हात मजबूत करण्यासाठी नवनीत यांना लोकसभेत पाठवायचे असून भाजपाचेही जिल्ह्यात संघटन वाढणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.